येरमाळा घाटात एसटी बस २५ फूट खोल खड्ड्यात पलटी
ब्रेक निकामी झाल्याने अपघात; ३५ प्रवासी जखमी, दोराच्या साहाय्याने पोलिसांनी केले बचावकार्य
Yermala pratinidhi (Sudhir Lomate)-
बार्शीहून कळंबकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बार्शी आगाराच्या एसटी बसचा येरमाळा घाटातील उतारावर ब्रेक निकामी झाल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात पलटी झाल्याची घटना गुरुवारी (ता. १०) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात सुमारे ३५ प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बार्शीहून कळंबच्या दिशेने ही बस प्रवाशांना घेऊन येत होती. येरमाळा घाटातील उतारावर अचानक बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. परिस्थिती लक्षात येताच काही प्रवासी बसमधून खाली उतरले. बस मागे सरकत असल्याने उतरलेल्या प्रवाशांनी टायरला दगड लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे अंदाज न आल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात पलटी झाली.
बस खड्ड्यात पलटी होताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, बसच्या मागून येणाऱ्या एका वाहनचालकाने तत्काळ येरमाळा पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच येरमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले.
खोल खड्ड्यात पलटी झालेल्या बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. बसमधून आधी उतरलेले प्रवासी, पोलिस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी दोराच्या साहाय्याने खड्ड्यात उतरून जखमी प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर चार १०८ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून जखमींना पुढील उपचारासाठी धाराशिव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. काही प्रवाशांच्या हातापायांना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच कळंब आगाराचे आगारप्रमुख विजय घोलप व सहायक वाहतूक अधीक्षक बालाजी मुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन जखमी प्रवाशांची तसेच बसचालक धनवे व वाहक नले यांची विचारपूस केली.
रात्रीच्या अंधारात घाटातील खोल खड्ड्यात बस पलटी झाल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र, येरमाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केल्याने जखमी प्रवाशांना वेळेत उपचारासाठी हलविण्यात आले. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.